Download Our App
Post Your Achievements
मी भास्कर हलामी, आज संशोधक म्हणून अमेरिकेत काम करीत आहे. माझ्या गावात गोंडी हिच भाषा बोलली जात होती, ती आजही बोलली जाते. माझे वडील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, कसनसूर, ता. ऐटापल्ली, जि. गडचिरोली येथे स्वयंपाकी पदावर कार्यरत होते. त्यामुळे आमचा परिवार हा आश्रमशाळेमध्ये राहायचा, आणि याचा फायदा मला असा झाला की, आश्रमशाळेत माझे शिक्षण सुरू झाले. त्यामुळे सर्वप्रथम मी आदिवासी विकास विभागाचे मनापासून आभार व्यक्त करतो.मी शालेय शिक्षण घेत असतांना माझ्या घरी गोंडी हीच एक भाषा बोलली जात होती, आणि शाळेच्या परिसरात व शाळेत देखील बरेच विद्यार्थी गोंडी हीच भाषा बोलत होते. त्यामुळे मला सर्वप्रथम संघर्ष करावा लागला तो गोंडीतून मराठी भाषा शिकणे. यानंतर मी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर मला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावयाचा असल्यामुळे मला आता मोठी समस्या आली ती इंग्रजी भाषेची, त्यामुळे मला इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविणे आवश्यक होते, मी शांत बसलो नाही, आणि मी निरंतर प्रयत्न करीत राहीलो, आणि मी इंग्रजीवर प्रभुत्व प्राप्त केले. त्यानंतर मी एम.बी.बी.एस. ला प्रवेश घेतला आणि मी एम.बी.बी.एस. चे शिक्षण पूर्ण केले, आणि आज मी अमेरीकेत एक संशोधक म्हणून कार्यरत आहे. समाजातील सुशिक्षीत लोकांनी, सुशिक्षीत पालकांनी, आपल्या पाल्यास व इतर विद्यार्थ्यांस शिक्षणाचे महत्व पटवून देणे अत्यंत महत्वाचे आहे. उच्च शिक्षणासाठी, परदेशी शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्ती उपलब्ध आहे, याचा फायदा आपण घेतला पाहिजे. भारत सरकारच्या व राज्य सरकारच्या शिष्यवृत्तीचा आदिवासी विद्यार्थ्यांनी पुरेपुर फायदा घेतला पाहिजे. आदिवासी समाज बांधवांनी निरनिराळ्या योजनेचा फायदा घ्यावा, आपला विकास ही आपली जबाबदारी आहे, आणि विद्यार्थ्यांनी दर्जेदार उच्च शिक्षणाकडे विशेष लक्ष देणे ही काळाची गरज आहे.
Gadchiroli - Etapalli